येरमाळा येथील चोराखळी शिवारात 31 ऑगस्ट 2024 रोजी भीषण अपघात घडला. या अपघातात मोरगाव येथील 30 वर्षीय रंजित अरुण कागदे यांचा मृत्यू झाला. रंजित हे आपल्या कारने राष्ट्रीय महामार्ग 52 वरून प्रवास करत असताना, समोरून आलेल्या ट्रकने अचानक डावीकडे वळण घेतले. यामुळे रंजित यांची कार ट्रकला मागून धडकली आणि डिव्हायडरमध्ये अडकली. या अपघातात रंजित गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक जखमी रंजित यांना मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.
रंजित यांचे वडील अरुण भाउराव कागदे यांनी 2 सप्टेंबर रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम 281, 106(1)(2), 324(4), 324(5) सह मोटार वाहन कायदा कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फरार ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.
भूममध्ये आर्थिक वादातून मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
भूम तालुक्यातील चुंबळी येथे 1 सप्टेंबर 2024 रोजी आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून 55 वर्षीय आबा प्रन्हाद मारकल यांना समधान महालिंग गिराम याने मारहाण केली. या घटनेत मारकल यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
मारकल यांनी 2 सप्टेंबर रोजी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गिराम याच्याविरुद्ध भादंवि कलम 118(1), 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.