तामलवाडी : दारू पिऊन घरी आलेल्या मुलाची वडिलांनीच लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथे घडली आहे. समाधान बिभीषण चव्हाण (वय २५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, वडील बिभीषण शेषद्री चव्हाण (वय ५०) यांच्याविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ मे २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत समाधान बिभीषण चव्हाण हा दहिवडी येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी, ४ मे २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन घरी आला होता. यावरून त्याचे वडील बिभीषण शेषद्री चव्हाण यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि बिभीषण चव्हाण यांनी समाधानला लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत समाधान गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मयताचे चुलते विश्वास शेषाद्री चव्हाण (वय ५०, रा. दहिवडी) यांनी ५ मे २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी वडील बिभीषण शेषद्री चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) (सदोष मनुष्यवध) आणि १०९ (गुन्ह्यास प्रवृत्त करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे दहिवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.