तुळजापूर: एक गाडी… पण दोन कथा. एकीकडे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात हुंड्यासाठी दिलेल्या फॉर्च्युनरने दोन कोटींच्या हव्यासापोटी एका लेकीचा जीव घेतला आणि ही गाडी बदनामीच्या गर्तेत सापडली. तर दुसरीकडे, तुळजापूरच्या एका बापाने याच फॉर्च्युनरला आपल्या लेकीच्या वाढदिवसाची ‘भेट’ आणि स्वतःच्या कष्टाची ‘ओळख’ बनवून एक नवी, सकारात्मक चर्चा सुरू केली आहे.
‘ढवरा मटणा’ने आणली ‘भाग्या’ची गाडी
तुळजापूरजवळ ‘ढवरा मटणा’साठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक सध्या सोशल मीडियावर हिरो ठरले आहेत. निमित्त ठरलंय त्यांच्या मुलीच्या, भाग्यश्रीच्या वाढदिवसाचं. याच खास दिवशी त्यांनी नवी कोरी टोयोटा फॉर्च्युनर खरेदी केली. गाडीची पूजा, लेकीसोबत केक कापणे आणि कुटुंबाचा तो आनंदसोहळा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “बाप असावा तर असा,” अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दूरदूरून खवय्ये ज्यांच्या ‘ढवरा मटणा’वर तुटून पडतात, त्या हॉटेल मालकाने अल्पावधीतच व्यवसायात जम बसवला. उत्कृष्ट चव, शिस्त आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर या त्रिसूत्रीवर त्यांनी हे यश मिळवले आहे, असे स्थानिक सांगतात.
एकीकडे कौतुक, दुसरीकडे प्रश्नचिन्ह
हा व्हायरल व्हिडिओ जिथे कौतुकाचा विषय ठरला आहे, तिथे काही शंकासुरांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. “फक्त तीन महिन्यांत एवढी मोठी गाडी कशी काय आली?” असा सवाल काहीजण विचारत आहेत. मात्र, बहुतांश नेटकऱ्यांनी “हे कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आहे,” म्हणत मालकाचं अभिनंदन केलं आहे.
गाडी तीच, कहाणी वेगळी
एकाच गाडीची ही दोन रूपं समाजाला आरसा दाखवणारी आहेत. पुण्यात जिथे फॉर्च्युनर लोभाचं आणि क्रूरतेचं प्रतीक ठरली, तिथे तुळजापुरात ती कष्टाचं, पित्याच्या प्रेमाचं आणि यशाचं प्रतीक ठरली आहे. वस्तू तीच असते, पण तिचा वापर करणाऱ्या माणसांची नियत तिचं नशीब ठरवते, हेच या दोन घटनांमधून अधोरेखित होत आहे. तुळजापूरच्या या हॉटेल मालकाने केवळ गाडी नाही, तर मेहनतीवरचा विश्वास नव्याने जिंकला आहे, हे नक्की!
व्हिडीओ पाहा