धाराशिव : धाराशिव शहरातील वैराग नाका परिसरात सर्वे नंबर ४२९ मध्ये अनाधिकृतपणे उभारण्यात आलेले चार कत्तलखाने आज जमीनदोस्त करण्यात आले. पोलीस विभाग, तहसील कार्यालय आणि नगर परिषद, धाराशिव यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. “गो माफिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाने हे कत्तलखाने उभारले होते, असे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आज सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान ही कारवाई पार पडली. या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक शकील शेख, नायब तहसीलदार श्री. शिंदे, आणि नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. कुलकर्णी हे त्यांच्या पथकासह उपस्थित होते. कारवाईसाठी जेसीबी आणि ट्रॅक्टरसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.