मुरूम – सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावर दाळींब येथील साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ आज (दि. २१) सकाळी ६:३० वाजता दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमधील सर्वजण कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून, या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बिदर जिल्ह्यातील काही तरुण देवदर्शनासाठी क्रेटा कारने (क्र. KA38M9946) सोलापूरकडून उमरग्याच्या दिशेने जकेकुर चौरस्ता मार्गे बिरूदेव मंदिराकडे जात होते. त्याचवेळी, हैदराबादकडून सोलापूरच्या दिशेने एक सफारी गाडी (क्र. MH14EP0732) येत होती. दाळींबजवळ आल्यावर महामार्गावरील खड्ड्यांमुळे किंवा समोरचा अंदाज न आल्याने सफारी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडी दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रेटा कारवर जोरात आदळली.
ही धडक इतकी भीषण होती की, क्रेटा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात क्रेटामधील रतीकांत मारोती बसगोंडा (वय ३०), शिवकुमार चितानंद बग्गे (वय २६), संतोष बजरंग बसगोंडा (वय २०) आणि सदानंद मारोती बसगोंडा (वय १९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिगंबर जगन्नाथ सागुलगी आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण खासमपूर (ता. जि. बिदर, कर्नाटक) येथील रहिवासी आहेत.
अपघातानंतर वाहनांमध्ये अडकलेल्या मृत व जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार व पोलिस उपनिरीक्षक गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्रथम येणेगुर येथील उपकेंद्रात नेण्यात आले, मात्र तेथे सुविधेअभावी त्यांना पुढील उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांचे मृतदेह देखील शवविच्छेदनासाठी उमरगा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
खड्डे आणि निकृष्ट कामामुळेच अपघात?
हा अपघात राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे आणि रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळेच घडल्याचा आरोप होत आहे. तसेच, अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने चालकांना अंदाज येत नाही, ज्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
प्राधिकरण अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा नोंदवा: बाबा जाफरी
या अपघाताला महामार्ग प्राधिकरण विभाग आणि संबंधित कंत्राटदार पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जळकोट ते तलमोड या मार्गावरील रस्ता बऱ्याच ठिकाणी खचलेला आहे आणि उखडलेला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही केवळ मातीमिश्रित खडीने खड्डे बुजवण्याचा देखावा केला जातो. आजचा अपघात हा खड्डेमय रस्त्यामुळेच घडला आहे. या बेजबाबदार कारभारामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला असून, प्राधिकरण अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.”