लोहारा – घरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार जेवळी (उत्तर) येथे उघडकीस आला आहे. लोहारा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ५ किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेसह दोघांवर एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गांजा विरोधी कारवाई सुरू असताना, पोलिसांना जेवळी येथे गांजाचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:२० वाजण्याच्या सुमारास लोहारा पोलिसांच्या पथकाने जेवळी (उत्तर) येथील एका घरावर छापा टाकला.
या छाप्यात आरोपी गोरीबी जबार शेख (वय ७८ वर्षे) आणि अली अकबर अब्दुल शेख (दोघे रा. जेवळी उत्तर, ता. लोहारा) यांच्या राहत्या घरात ५ किलो २६६ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. हा साठा त्यांनी चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ५ हजार ३२० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गोरीबी शेख आणि अली शेख यांच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८(क), २०(बी) आणि ii(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.





