परंडा – परंडा तालुक्यातील घारगाव येथे एका तरुणाला आठ जणांच्या टोळक्याने कोयता आणि काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आई-वडिलांनाही या टोळक्याने मारहाण केली. ही घटना गेल्या गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) रात्री घडली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय महादेव लटके (वय ४०, रा. घारगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घारगाव येथे आरोपींनी त्यांचा मुलगा कुणाल संजय लटके याला लक्ष्य केले. वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून कुणाल याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपी सचिन बबन काळे, नंदु बबन काळे, पप्पु अनिल काळे, भारत साधु काळे, रणजित रघुनाथ काळे, विश्वजीत रणजित काळे, लक्ष्मण सुरेश काळे आणि बबन काळे (सर्व रा. घारगाव) यांनी कुणालला लाथाबुक्क्यांनी, लोखंडी कोयत्याने आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी झाला.
दरम्यान, आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादी संजय लटके आणि त्यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेले असता, संतप्त आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेनंतर संजय लटके यांनी सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आठही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार दंगल घडवणे, जीवघेणा हल्ला करणे आणि मारहाण करणे यांसारखे गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.