धाराशिव – तालुक्यातील घाटंग्री येथील श्री व्यंकटेश माध्यमिक आश्रम शाळेच्या महिला वसतिगृह अधीक्षिकेने संस्थाचालक आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संस्थाचालक मागील रागातून व आर्थिक उद्देशाने मानसिक त्रास देत असून, समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कोणतीही बाजू ऐकून न घेता नियमबाह्य पद्धतीने निलंबित केल्याचा दावा अधीक्षिका नीता ठाकूर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून न्यायाची आणि संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नीता ठाकूर या २०११-१२ पासून घाटंग्री येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत निवासी वसतिगृह अधीक्षक म्हणून कायमस्वरूपी कार्यरत आहेत. मात्र, संस्थाचालक गुलाबराव टोपाजी जाधव आणि सचिव कविता गुलाबराव जाधव हे प्रशासकीय बाबी पुढे करत आर्थिक फायद्यासाठी मानसिक छळ करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली जात असून, ती पूर्ण न केल्याने त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, त्या भटक्या जमाती प्रवर्गातील असूनही त्यांची नेमणूक खुल्या प्रवर्गातून करण्यात आली आहे.
ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे की, ३ मार्च २०२५ रोजी सकाळी संस्थाचालक जाधव यांनी “ऐ बाई, तुला नोकरी नीट करायची आहे की नाही? तुझे चारित्र्य बघ” असे म्हणत अर्वाच्च भाषेत अपमान केला व अंगावर धावून गेले. यामुळे ठाकूर यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या २० मार्चपर्यंत वैद्यकीय रजेवर होत्या.
दिनांक २१ मार्च रोजी त्या रजेचा अर्ज व वैद्यकीय कागदपत्रे घेऊन शाळेत गेल्या असता, त्यांना धक्कादायक प्रकार समजला. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत व सहाय्यक निरीक्षक भोसले यांनी २० मार्च रोजी संस्थेच्या सांगण्यावरून शाळेला भेट दिली होती. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, अरवत यांनी त्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय घेणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याच दिवशी संस्थाचालकांच्या दबावाखाली येऊन, ठाकूर यांची बाजू विचारात न घेता, त्यांच्या निलंबनाची शिफारस करणारे पत्र समाज कल्याण विभागाने संस्थेला दिले. याच पत्राच्या आधारे संस्थाचालकांनी २४ मार्च रोजी ठाकूर यांना नियमबाह्य व बेकायदेशीररित्या निलंबित केले.
यापूर्वी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी देखील ठाकूर यांनी अशाच अन्यायाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून संस्थाचालक मुख्याध्यापकांवर दबाव आणून त्यांना वारंवार त्रास देत आहेत, असेही ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे.
नीता ठाकूर यांनी या संपूर्ण प्रकरणात आपली बाजू ऐकून घ्यावी, अन्यायकारक निलंबन रद्द करावे आणि दोषी संस्थाचालक व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.