पेंद्या – अगं ये गंगे, भावड्या अन माझ्यासाठी दोन कप चहा कर बघू ..
गंगी – आवं धनी , कालच पत्ती संपलीया… मग दूध देऊ का ?
भावड्या – राहू द्या वहिनी,म्या अन्याच्या टपरीवर आताच पिऊन आलोय… ..
पेंद्या – बरं झालं , पत्तीवरून आठवलं… काल तुझे ओमदादा, तू किस झाड की पत्ती है ? कुणाला म्हणत व्हते रे…
भावड्या – अजून कुणाला ? सावंत साहेबाइषियी बोलत व्हते…
पेंद्या – ऑ ? पहिल्यांदाच तोंड उघडलं म्हणायचं … एव्हडं काय झालं व्हतं रं ? …
भावड्या – आरं , परवा ढोकीच्या मिटिंगमध्ये पवनराजे इषियी त्यांनी लईच गरळ ओकली बघ …
पेंद्या – ते तर नेहमीच ओकत्यात की , त्यात काय नवल…
भावड्या – दादानी किती दिस गप्प बसायचं , आजपर्यंत मान ठेवलाच की , आता घेतलं शिंगावर …
पेंद्या – मग, आता पण मान ठेवायचा …
भावड्या – स्व. बापाइषियी कोण वाईट – वाईट ऐकून घेईल रं ? या येळेस दादाचं पित्त लई खवळलंय बघ..
पेंद्या – सगळ्यांना वाटत व्हतं , तुझे दादा फकस्त राणा दादा आणि पाटील फॅमिलीवर बोलू शकतात..
भावड्या – मागच्या येळेला सावंत साहेबानी मदत केली व्हती म्हणून ओमदादांनी जाणीव ठेवली व्हती, पण आता..
पेंद्या – आता काय रं ?
भावड्या – आता डोक्यावरून लईच पाणी वाहू लागलंय , मग काय दिला थेट इशारा..
पेंद्या – मागच्या येळी, ओमदादाला तिकीट मिळावं म्हणून सावंत साहेबानी दहा कोटी दिलं होतं म्हण…
भावड्या – तो पक्ष निधी दिला व्हता, तो ओमदादाकडून वसूल देखील केला की ..
पेंद्या – मग यंदा का दिला नाही ? म्हणूनच पुतण्याचं तिकीट कापलं वाटतं ?
भावड्या – यंदा अजित दादा वरचढ ठरले, त्यामुळे सावंत साहेबांची मात्रा चालली नाय बघ….
पेंद्या – काय का असेना, तुझ्या ओमदादानी लैच धाडस केलं म्हणायचं …
भावड्या – डॉ. पाटील अन राणा पाटलांना ओमदादांनी गार केलंय, मग सावंत , किस झाड की पत्ती है ?
पेंद्या – हम्म, मग आता ओमदादा आणि सावंत साहेब यांच्यात सामना रंगणार म्हण की ..
भावड्या – आता त्यांनी ब्र शब्दच काढावा, मग बघ ओमदादा कसं गार करतात ते…
पेंद्या – बघू आता , कोण कुणाला गार करतंय , अन कोण गारीत जातंय ..
पेंद्या – तू बघच आता, येतो मी, जरा सोमनाथ आप्पाकडे जावून येतो…
( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )