धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या लढाईला अजून दीड महिना बाकी आहे, पण इथल्या काही नेत्यांना आधीच आमदारकीची स्वप्नं पडायला लागली आहेत. विशेष म्हणजे, यापैकी एक विशेष स्वप्नद्रष्टा म्हणजे ऍड. व्यंकट गुंड. या स्वप्नातल्या आमदारकीच्या धंद्यात, गुंड साहेबांनी एक वेगळाच मार्ग निवडला आहे.
कधीकाळी भाजपमधून काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आलटून – पालटून गेलेले आणि आता काँग्रेसमधून पुन्हा भाजपमध्ये येऊन पुन्हा एकदा बंडखोरीचे रणशिंग फुंकणारे गुंड साहेब, तुळजापूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे विनंती करत आहेत. “उमेदवारी दिली नाही, तर मी बंडखोरी करणार!” अशी गर्जना करत, ते मतदारसंघात जोरदार दौरे करत आहेत. म्हणजे, आता त्यांच्या स्वप्नाचा तडाखा प्रत्यक्षातही दिसू लागलाय!
आता खास गोष्ट अशी की तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांची उमेदवारी ‘फिक्स’ आहे. पण गुंड साहेबांना हे स्वप्नाच्या मधे आडवे आलंय की काय, त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारावरच हल्ला चढवला आहे. “राणा जगजीतसिंह साहेब, साइड व्हा, मला आमदारकीचं खायचंय,” असं काहीसं त्यांचं धोरण दिसतंय.
गुंड साहेबांची वकीली धंद्याबरोबरच, रूपामाता बँक, दोन गूळ पावडरचे कारखाने, दूध डेयरी… असे अनेक उद्योग आहेत. वाटतंय की या सर्व उद्योगांची गाडी चांगलीच सुरू आहे. पण, अजून एक उद्योग जोडायचाय – आमदारकीचा. पण त्यात भाजपचे ढोल त्यांना थोडेसे कडकडतायत.
गुंड साहेबांना भाजप उमेदवारी देणार नाही, हे आता जवळपास ठरलेलं आहे. त्यामुळे गुंड साहेब आता कोणत्या पक्षाची रांग लावणार, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. कदाचित, त्यांचं नवीन स्वप्न कोणत्या पक्षात असेल याचा अंदाज लावायला लोकांना लवकरच काम मिळणार आहे!
राजकारणात स्वप्नं बघणं मोफत असतं, पण त्याच्या पूर्ततेसाठी मात्र भलताच खेळ करावा लागतो, हे गुंड साहेबांकडून शिकावं!
– बोरूबहाद्दर