धाराशिव जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. सध्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भाडेतत्त्वावर देण्यात आले असले तरी, तेथील असुविधा कायम आहेत. रुग्णांना अत्यावश्यक सेवा देण्यात अपयश आले असून, तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी धावपळ होत आहे.
या परिस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मोठी घोषणा करून, धाराशिवला ५०० खाटांचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय मंजूर केले. या घोषणेनंतर १५ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत भूमिपूजन देखील पार पडले, मात्र या भूमिपूजनाचा हेतू केवळ राजकीय होता, असे जिल्ह्यातील काही तज्ज्ञ आणि स्थानिक लोक मानत आहेत.
ज्या ठिकाणी नवीन रुग्णालय बांधण्याचे ठरवले, तिथे भूमिपूजन होऊन आता सात महिने झाले आहेत. परंतु, अद्याप एक वीटही रचली गेलेली नाही. जिल्ह्यातील जनतेमध्ये आता याबाबत असंतोष पसरला आहे. “नवे रुग्णालय उभारण्यासाठी सात महिने झाले, मात्र कामास काही सुरुवात झाली नाही,” अशी खंत व्यक्त केली जात आहे. इमारत बांधकामाच्या प्रक्रियेला कधी सुरूवात होईल, हे कोणीही सांगू शकत नाही, कारण जागेचा तिढा अजूनही मिटलेला नाही.
राजकीय उद्दिष्टांसाठी भूमिपूजनाचा वापर हे काही नवीन नाही. यापूर्वीही अशा घोषणा आणि भूमिपूजनांचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळाले आहे. मात्र, या वेळी जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांच्या दृष्टीने ही घोषणा अधिक गंभीर मानली जात आहे.
या परिस्थितीत प्रश्न असा आहे की, जिल्ह्याच्या आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने जाहीर केलेली योजना प्रत्यक्षात कधी येणार? आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्र्यांनी सात महिने आधी दिलेली घोषणा कधी सत्यात उतरणार? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जनतेला अजून किती काळ वाट पाहावी लागेल?
धाराशिव जिल्ह्यातील रुग्णालय हे केवळ एक संरचना नाही, तर हजारो गरजू आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी धडपडणाऱ्या लोकांसाठी जीवनरेखा आहे. या बाबतीत सरकारी यंत्रणेची धीम्या गतीची कामगिरी आणि फक्त घोषणा करून हात झटकणे योग्य नाही. जर सरकारने खरोखरच धाराशिवच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करायची असेल, तर भूमिपूजनाच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य द्यायला हवे.
राजकीय फायद्याकरिता रुग्णालयांसारख्या महत्त्वाच्या सुविधांच्या बाबतीत खेळ मांडला जाणे म्हणजे समाजाशी अन्याय आहे. भूमिपूजनाच्या फार्सला लोक कंटाळले आहेत. आता या घोषणांवर वेळेत अंमलबजावणी व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
धाराशिवच्या नागरिकांनी आवाज उठवून या प्रश्नाची सोडवणूक लवकरच करण्यासाठी दबाव टाकायला हवा. सरकारच्या घोषणांचा फायदा प्रत्यक्षात होण्यासाठी आणि रुग्णालयाचे स्वप्न साकार होण्यासाठी जनतेने संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह