तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा येथील रहिवासी आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी भानुदास दळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २००३ मध्ये केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून त्यांच्यावर दाखल झालेला अवैध सावकारीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला आहे
2003 मध्ये दळवी यांनी वसंत टाकणे यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली होती. 2014 मध्ये टाकणे यांनी दळवी यांच्यावर अवैध सावकारीचा आरोप करत जमीन सोडवण्याची मागणी केली होती, जी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी फेटाळली होती.
2017 मध्ये वसंत टाकणे यांचे चिरंजीव एकनाथ टाकणे यांनी नवीन सावकारी कायद्याअंतर्गत दळवी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 2003 च्या व्यवहाराला 2014 च्या सुधारित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे दळवी यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात आला आहे.
प्रकरणाचा इतिहास:
- २००३: दळवी यांनी वसंत टाकणे यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली.
- २०१४: वसंत टाकणे यांनी दळवी यांच्यावर तत्कालीन सावकारी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करून अवैध सावकारीचा आरोप केला आणि जमीन सोडवण्याची मागणी केली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धाराशिव यांनी चौकशी करून ही तक्रार रद्द केली.
- २०१४: सावकारी कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि कलम ३९ अंतर्गत अवैध सावकारीसाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली.
- २०१७: वसंत टाकणे यांचे चिरंजीव एकनाथ टाकणे यांनी नवीन कायद्याअंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार दाखल केली.
- २०२२: जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कर्मचारी रवींद्र कुलकर्णी यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दळवी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यानुसार दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
उच्च न्यायालयात धाव:
दळवी यांनी ॲड. सुशांत चौधरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की २००३ च्या व्यवहाराला २०१४ च्या सुधारित कायद्याअंतर्गत चालवता येणार नाही.
उच्च न्यायालयाचा निकाल:
माननीय उच्च न्यायालयाने दळवी यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द केला.