परंडा : तालुक्यातील पाचपिंपळा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना २४ डिसेंबरच्या रात्री ते २५ डिसेंबरच्या पहाटेदरम्यान घडली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम बाबुराव गरड (वय ३५, रा. पाचपिंपळा, ता. परंडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी श्रीराम गरड यांच्या घराचे कडी-कोंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
त्याचबरोबर चोरट्यांनी गावातील ऊस तोड मजूर मुकेश ईदु भिलचंद्र (मूळ रा. मेढाराना, राज्य मध्य प्रदेश, ह.मु. पाचपिंपळा) आणि सौदागर विलास ढोंगे (रा. पाचपिंपळा) यांचे दोन मोबाईलही पळवले. अशा प्रकारे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल मिळून एकूण ३,२५,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पोलिस कारवाई:
श्रीराम गरड यांनी २५ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३०५(ए) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.






