उमरगा: शहरातील चोरीच्या घटना वाढत असून रविवारी (दि. 19) धनलक्ष्मी कॉलनीत दोन घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. चोरीतील एकूण रक्कम सुमारे चार लाख रुपये असल्याचे समजते.
रविवारी भर दुपारी धनलक्ष्मी कॉलनीतील बालाजी काशिनाथ दंडगे यांच्या घरात चोरी झाली. दंडगे आपल्या व्यवसायानिमित्त बाहेर होते. चोरट्यांनी दुपारी 12 ते 5 वाजेच्या दरम्यान घराचे गेट आणि दाराचे कुलूप तोडले. घरातील पलंगाखाली ठेवलेल्या चावीने कपाट उघडून त्यातील 102 ग्रॅम सोन्याचे दागिने व 10 तोळे चांदीचे दागिने चोरले. यांची किंमत पोलिसांच्या नोंदीनुसार 3 लाख 26 हजार रुपये आहे. दंडगे यांच्या पत्नीने मकर संक्रांतीसाठी हे दागिने बँकेतून आणले होते.
शेजाऱ्यांनी संध्याकाळी घराचे कुलूप तोडलेले पाहिल्यानंतर दंडगे व पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
याचवेळी समोरच्या घरातील विकास बनसोडे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. सोमवारी सकाळी घरी परतल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट व गल्ले फोडून 40 हजार रुपयांची रोख रक्कम व अर्ध्या तोळ्याचे दागिने चोरले.
सोमवारी (दि. 20) श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान चोरी झालेल्या घरांच्या आसपासच फिरत राहिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या नोंदीतील सोन्याची कमी किंमत?
सध्याच्या बाजारभावानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार रुपये आहे. तरीही 102 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची किंमत फक्त 3 लाख 26 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. इतकी कमी किंमत कशी काय ठरवली याचा खुलासा पोलिसांनी करणे गरजेचे आहे.