मुरुम: मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी आदम महमद कुरेशी (वय ४४, रा. मौलाली चौक, मिल्लत मोल्ला, सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.
दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुरुम मोड येणेगुर शिवार येथे कुरेशी हा एमएच १३ डीक्यु ९१४७ क्रमांकाच्या आयशर टेम्पोमध्ये ३१ म्हशी घेऊन जात होता. यावेळी जनावरे टेम्पोमध्ये दाटीवाटीने बांधलेली होती. तसेच त्यांच्यासाठी चारापाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. जनावरांना क्रूरतेने वागवून कत्तलखान्यात नेले जात असल्याचे गौरक्षकांना आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कुरेशीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध प्राण्यांस क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) (ए) (डी) (एच), सह ११९ म.पो.का. सह प्राणी संरक्षण कायदा सुधारित १९९५ कलम ५(अ), ५(ब) व ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या टेम्पोची किंमत २०,०१,००० रुपये असून त्यातील ३१ म्हशींची सुटका करण्यात आली आहे.