धाराशिव – शहरातील खिरणी मळा परिसरात बेकायदेशीररित्या गोवंशीय मांसाची वाहतूक करताना पोलिसांनी टेम्पोसह मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केले. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खुर्शीद पाशा शेख (वय ४०, रा. फराज गल्ली, धाराशिव) हा टाटा टेम्पो (क्र. एमएच ०९ के ५२५१) मधून १,१८५ किलो वजनाचे गोवंशीय मांस वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, दि. ९ मार्च रोजी दुपारी १.३५ वाजता पोलिसांनी कारवाई करून सदर टेम्पो अडवला असता, त्यामध्ये एकूण २,३७,००० रुपये किमतीचे गोमांस आढळून आले.
पशुवैद्यकीय विभागाची पूर्व परवानगी न घेता गोवंशाची कत्तल करून संशयितरीत्या गोमांस वाहतूक केल्याने आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम २००५ मधील कलम ५(सी) व ९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात १०६ गुन्हे नोंद
धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयपणे अवैध वाहतूक, गोमांस वाहतूक, प्राण्यांची छळवणूक, तसेच अनधिकृत कत्तलखाने उभारण्याचे प्रकार वाढले असून, २०२४ व २०२५ या वर्षांत एकूण १०६ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेषतः धाराशिव शहरातील खिरणी मळा, नागनाथ रोड, स्मशानभूमीच्या आजूबाजूला आणि भोगावती नदीच्या किनारी अनधिकृत कत्तलखाने उभारण्यात आल्याचे आढळून आले.
पोलिस व नगरपरिषदेकडून संयुक्त मोहीम
या पार्श्वभूमीवर धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, सपोनि रविंद्री अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, अक्षय डिघोळे व पोलीस अंमलदार तसेच धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती फड, नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. दि. १० मार्च २०२५ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत विशेष मोहीम राबवून अनधिकृत कत्तलखाने संपूर्णपणे निष्कासित करण्यात आले.
शहरात खिरणी मळा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर पालिका व पोलिस प्रशासनाने सोमवारी कारवाई करत चार कत्तलखाने जेसीबीने जनीनदोस्त केले.
सदर मोहिम पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शाफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. धाराशिव शहर पोलिसांनी या कारवाईसह जिल्ह्यातील अवैध गोमांस वाहतूक आणि कत्तलखाने नष्ट करण्यासाठी पुढील कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनीही अशा अनधिकृत कत्तलखान्यांबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.