धाराशिव: मौजे वलगुड (ता. जि. धाराशिव) शिवारात रेड्यांच्या (Buffalo Fight) बेकायदेशीर टक्करीचे आयोजन करून प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:२५ वाजण्याच्या सुमारास वलगुड शिवारात काही लोकांनी बेकायदेशीररीत्या जमाव जमवून रेड्यांच्या टक्करींचे आयोजन केले होते. या झुंजीमध्ये रेड्यांची आपसात टक्कर लावून त्यांना निर्दयतेने आणि क्रुरतेने वागणूक देण्यात आली, ज्यामुळे प्राणी जखमी झाले.
पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. याप्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
१. महेश चौधरी (रा. उंबरे कोठा, धाराशिव) २. बाजीराव करवर (रा. राघुचीवाडी) ३. अमित झेंडे (रा. सांजा चौक, धाराशिव) ४. भाउ पवार (रा. जुना बस डेपो, धाराशिव) ५. मोहसिन पठाण (रा. धाराशिव) ६. अकबर शेख (रा. धाराशिव) ७. अकबर कुरेशी (रा. धाराशिव) ८. अनिकेत गजने (रा. धाराशिव)
या सर्व आरोपींविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम’ कलम ११(१)(अ), ११(१)(एम), ११(१)(एन) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.





