भूम – शहरात कत्तलीसाठी गायी आणि वासरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना भुम पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि. ७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास भुम येथील शासकीय दूध डेअरी परिसरात करण्यात आली. पोलिसांनी पिकअप वाहनासह एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सय्यद अमर सय्यद युसुफ (वय ५५ वर्षे) आणि अरबाज बशीर कुरेशी (दोघे रा. परंडा, ता. परंडा, जि. धाराशिव) हे पिकअप वाहन (क्र. एमएच ४८ ए.वाय. ५१७१) मधून गोवंश जातीच्या ४ जर्सी गायी आणि वासरांना घेऊन जात होते. या जनावरांची किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रुपये आहे.
आरोपींनी या गायी व वासरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यांना निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने नेले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. भुम पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहन आणि जनावरे ताब्यात घेतली. वाहनासह जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ४ लाख ७५ हजार रुपये आहे.
याप्रकरणी, भुम पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, सय्यद अमर सय्यद युसुफ आणि अरबाज बशीर कुरेशी यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१), (ड)(इ)(ई)(ऐ)(ठ) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ व ९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास भुम पोलीस करत आहेत.