भूम – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री आणि साठा करणाऱ्या एका दुकानावर भूम पोलिसांनी छापा टाकला आहे. वालवड (ता. भूम) येथील पाटसांगवी रोडवर ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:२० वाजण्याच्या सुमारास वालवड येथील पाटसांगवी रोडवर असलेल्या ‘साई प्रोव्हिजन स्टोअर्स’मध्ये अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भूम पोलीस ठाण्याच्या पथकाने दुकानावर छापा टाकला.
यावेळी दुकानात आरोपी अक्षय बाळासाहेब विभुते (वय ३०, रा. वालवड) हा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी बाळगून असल्याचे आढळून आले.
जप्त केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी या छाप्यामध्ये खालीलप्रमाणे एकूण ३४,१६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे:
-
हिरा पान मसाला
-
व्ही-1 तंबाखू
-
गोवा गुटखा
-
राजनिवास पानमसाला
-
छोटा विमल
-
रॉयल ७१७
-
जाफरानी जर्दा (झेडएन)
-
बादशहा गुटखा
-
आरएमडी पान मसाला
गुन्हा दाखल
प्रतिबंधित गुटखा जवळ बाळगल्याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अक्षय विभुते याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ (विघातक पदार्थ देऊन दुखापत करणे), २७४ (अन्न भेसळ), २७५ (भेसळयुक्त अन्नाची विक्री) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(डी), २७(३)(इ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.






