धाराशिव: जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. एका आंतरराज्यीय दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. महादेव उर्फ गगन अरुण शिंदे (वय २२, रा. मस्सा, ता. कळंब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात गस्त घालत होते. यावेळी, मस्सा येथील महादेव शिंदे याने चोरलेल्या मोटारसायकली आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या पथकाने तात्काळ मस्सा येथे जाऊन संशयित आरोपी महादेव शिंदे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या मोटारसायकली येरमाळा, धाराशिव, ढोकी, तामलवाडी आणि कर्नाटक राज्यातून चोरल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी केलेल्या तपासात या मोटारसायकलींसंदर्भात येरमाळा, ढोकी, आनंदनगर, तामलवाडी आणि कर्नाटक राज्यातील लाकाल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पाचही मोटारसायकली जप्त केल्या असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील आणि परराज्यातील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.