धाराशिव : तालुक्यातील जहागीरदारवाडी येथे जागेच्या वादातून एका कुटुंबावर सहा जणांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम बालाजी राठोड (वय ६०, रा. जहागीरदारवाडी) यांना जागेच्या वादावरून गणेश बालाजी राठोड, ओमकार गणेश राठोड, संतोष बालाजी राठोड, सविता गणेश राठोड, शिला संतोष राठोड (सर्व रा. जहागीरदारवाडी) यांनी ७ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच चाकू व दगडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादींचे मुलगा अमर आणि पत्नी सरोजाबाई यांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी ९ मार्च रोजी तुकाराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 118(1), 115(2), 352, 351(2),(3), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जुन्या घराच्या वादातून मारहाण; पती-पत्नी जखमी
ढोकी : धाराशिव तालुक्यातील गोरेवाडी येथे जुन्या घराची भिंत पाडण्याच्या वादातून पती-पत्नीला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव सिताराम मेंढेकर (वय ३६, रा. गोरेवाडी) आणि त्यांच्या पत्नी मंजुरी मेंढेकर यांना ९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आरोपी सचिन सिताराम मेंढेकर, वैशाली सचिन मेंढेकर (दोघे रा. गोरेवाडी) आणि गणेश निवृत्ती चौगुले (रा. ढोराळा) यांनी जुन्या घराची भिंत पाडण्याच्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी महादेव मेंढेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 118(1), 115, 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पूर्वीच्या वादातून महिलेवर हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल
मुरुम : उमरगा तालुक्यातील महालींगरायवाडी येथे पूर्वीच्या वादातून एका महिलेवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरोधात मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभांगी सुभाष घोरपडे (वय ३५, रा. महालींगरायवाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांना ७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास आरोपी ज्योतीराम बाबुराव घोरपडे, राधा ज्योतीराम घोरपडे (दोघे रा. महालींगरायवाडी) आणि परमेश्वर अरुण मोरे, ज्ञानेश्वर अरुण मोरे (दोघे रा. जाजन मुगळी, ता. बसवकल्याण) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी शुभांगी घोरपडे यांनी ९ मार्च रोजी दिलेल्या तक्रारीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.