धाराशिव येथील राजीव गांधी नगर येथे राहणाऱ्या कलाम मिठ्ठुमियॉ कोतवाल यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत घडली.
कोतवाल यांनी 9 सप्टेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 331(4), 305(ए) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.
घरफोडी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल
उमरगा तालुक्यातील कोथळी येथे घरफोडी आणि फसवणुकीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. विलास विठ्ठल कांबळे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून सहा जणांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विलास कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 25 फेब्रुवारी 2023 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत वारंवार कांबळे यांच्या घरात प्रवेश करून चोरी केली. त्यानंतर हे प्रकरण मागे घेण्यासाठी त्यांनी कांबळे यांना धमकावले. याशिवाय, चोरीच्या रकमेची भरपाई म्हणून त्यांनी कांबळे यांना चुकीचा धनादेश देऊन फसवणूक केली.याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कांबळे यांनी 9 सप्टेंबर 2024 रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी फिर्यादी नामे-विलास कांबळे यांनी दि.09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. 380, 457, 454, 420, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी येथे गोठ्यातून म्हैस, गाय चोरी
तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गोंधळवाडी शिवारात एका शेतातील गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी एक म्हैस व एक गाय चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे 70,000 रुपये किमतीच्या जनावरांची हानी झाली आहे.
सुदर्शन अगंद मोटे (वय 32, रा. गोंधळवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, 29 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 ते 30 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 या वेळेत ही चोरी झाली. मोटे यांनी 9 सप्टेंबर रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तेर येथे एसटीएस कॉईन, केबल चोरी; स्वीच बॉक्स जाळला
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तेर येथील जॅकविल विहरीवर अज्ञात चोरट्यांनी एसटीएस मधील तांब्याचे कॉईन आणि पॅनेल बोर्डमधील केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे अंदाजे 75,000 रुपयांचे नुकसान झाले असून, चोरट्यांनी स्वीच बॉक्स जाळून त्याचेही नुकसान केले आहे.
ही घटना 20 ऑगस्ट 2024 रोजी घडली असून, याबाबत ढोकी ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल समुद्रे यांनी 9 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.न्या.सं. 303(2),324(2-6) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.