कळंब – ‘आमच्या महिलेकडे वाकून का बघतो’ या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मोठ्या मारामारीत झाले असून, एका गटाने जमून एका व्यक्तीला आणि त्याच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना कळंब शहरातील बुरुड गल्लीत घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बाबु कोरे (वय ३८, रा. बुरुड गल्ली, कळंब) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश कोरे यांची पत्नी कचरा टाकण्यासाठी बाहेर आली होती. यावेळी खाटीक गल्लीतील काही तरुणांनी, ‘तू आमच्या बाईकडे वाकून का बघतोस?’ अशी विचारणा करत गणेश कोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपी सोहेल बशीर बागवान, शोएब कुरेशी, हकीम कुरेशी, अनवर सलीम कुरेशी आणि इतर १० ते १२ जणांनी गैरकायदेशीर जमाव जमवून गणेश कोरे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून कोरे यांचे नातेवाईक भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर गणेश कोरे यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १६ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण, गैरकायदेशीर जमाव जमवणे, शिवीगाळ आणि धमकी देणे याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.