कळंब – कळंब शहरातील ‘निखिल एंटरप्राइजेस’ येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून २ लाख २४ हजार २९८ रुपये किमतीचे चोरीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि ॲल्युमिनियम तार जप्त करण्यात आली आहे. दिगंबर संदिपान काळे (वय २५, रा. आंदोरा, ता. कळंब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिगंबर काळे याने कळंब परिसरात चोरी केली असून, चोरलेला मुद्देमाल आपल्या घराजवळील शेतात लपवून ठेवला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपी दिगंबर काळे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने कळंब शहरातील निखिल एंटरप्राइजेस येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता, याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८०/२५ नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी पंचनामा करून आरोपीने लपवून ठेवलेले दुकानातून चोरलेले २,२४,२९८ रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि २००० मीटर ॲल्युमिनियम तार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच, हा गुन्हा आपण इतर साथीदारांच्या मदतीने केल्याचेही आरोपीने कबूल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कळंब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल रत्नदीप डोंगरे आणि बाबासाहेब गुरव यांच्या पथकाने केली आहे.