कळंब – येथील पोलीस ठाण्याजवळच असलेल्या अंबाबाई मंदिराजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ४१ वर्षीय व्यक्तीवर पाच जणांनी मिळून चाकू आणि वस्तऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शंकर बाबुशा पवार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर पवार (वय ४१, रा. कल्पनानगर, कळंब) यांचा आरोपींसोबत जुना वाद होता. मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अंबाबाई मंदिराजवळ आरोपी पिंटू राजेराव पवार, गंगाराम बापू पवार, बबलू राजेराव पवार, सुनील लाला पवार आणि बप्पा रामराजे पवार (सर्व रा. जुनी दूध डेअरी समोर, कळंब) यांनी शंकर पवार यांना अडवले.
आरोपींनी आधी पवार यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या चाकू व वस्तऱ्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर शंकर पवार यांनी बुधवारी, दि. १ ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.