कळंब – कळंबजवळील हावरगाव रस्त्यावर मोटारसायकलच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. राहुल तानाजी पवार (वय 27, रा. रमाई नगर, धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राहुल पवार, सचिन राजेंद्र पवार आणि सुरज संजय काळे हे तिघे जण एमएच 44 एम 0917 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कळंबहून हावरगावकडे जात होते. कळंब शिवारातील बब्रुवान काळे यांच्या घरासमोर वळणावर राहुलने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सचिन आणि सूरज या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि गुन्हा दाखल केला. राहुलची आई अनिता तानाजी पवार यांनी या अपघाताबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, कळंब पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125 (ए), 125(बी) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.