कळंब शहरातील द्वारका नगरात सापडलेल्या महिलेच्या सडलेल्या अवस्थेतील मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मनीषा बिडवे उर्फ कारभारी (वय 45) हिचा खून हा अनैतिक संबंधातून उद्भवलेल्या मानसिक व शारीरिक छळामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, खळबळजनक माहिती समोर येत आहे.
ड्रायव्हर ते अनैतिक संबंध, आणि नंतर छळ
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर भोसले नावाचा तरुण मागील काही महिन्यांपासून मनीषा बिडवे हिच्यासोबत काम करत होता. सुरुवातीला तो तिचा ड्रायव्हर होता. नंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. मात्र, यानंतर मनीषाने रामेश्वरला नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून धमकावणे, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, आणि दररोज शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.
22 मार्चचा दिवस ठरला मृत्यूचा
घटनेच्या दिवशी म्हणजे 22 मार्च रोजी, मनीषाने रामेश्वरला 100 उठाबशा काढायला लावल्या. सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या छळामुळे, रामेश्वरने तिच्या डोक्यात घातक वस्तूने वार केला. या मारहाणीतच मनीषाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतदेहासोबत दोन दिवस वास्तव्य
खुनानंतर, रामेश्वरने संपूर्ण दोन दिवस मृतदेह असलेल्या घरातच वास्तव्य केलं. तो तिथेच जेवण करत होता. तिसऱ्या दिवशी दुर्गंधी पसरू लागल्यानंतर त्याने घर सोडले. निघताना त्याने स्वतःची गाडी घेतली आणि आपला मित्र उस्मान सय्यद याला घटनास्थळी घेऊन आला. दोघांनी मिळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.
शव 27 मार्च रोजी आढळलं
27 मार्च रोजी, द्वारका नगरी वसाहतीतील मनीषा बिडवे हिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिलं असता सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
दमानियांचा आरोप आणि पोलिसांचा इन्कार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनीषा बिडवे हिचा मृत्यू संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला होता. त्यांनी ही महिला देशमुख यांना अडकवण्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावत “या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणताही संबंध नाही,” असं स्पष्ट केलं आहे.
तपासाच्या माध्यमातून अटक
पोलिसांनी घटनास्थळी मिळालेले फोन कॉल रेकॉर्ड्स, तांत्रिक पुरावे आणि परिसरातील माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. त्यातून रामेश्वर भोसले आणि सय्यद उस्मान गुलाब या दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
घटनाक्रम थोडक्यात:
- मृत महिला: मनीषा कारभारी बिडवे (वय 45), द्वारका नगरी, कळंब
- प्रकरणाचा उलगडा: अनैतिक संबंध, छळ, आणि खून
- मुख्य आरोपी: रामेश्वर भोसले – ड्रायव्हर ते नातं आणि हत्या
- सहआरोपी: सय्यद उस्मान गुलाब – मृतदेह लपवण्यास मदत
- हत्या कधी: 22 मार्च
- शव सापडल्याची तारीख: 27 मार्च
- पुरावे: फोटो-व्हिडीओ, कॉल रेकॉर्ड्स, घटनास्थळाची स्थिती
- पोलीस तपास: अटक करून चौकशी सुरू
या प्रकरणात अधिक चौकशीदरम्यान अजून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आरोपींच्या मोबाईलमधील पुरावे आणि जबाबांच्या आधारे, मनीषाच्या अन्य वादग्रस्त नात्यांचा तपास होण्याची शक्यता आहे. कळंब शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.