कळंब : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची शहरात छुप्या पद्धतीने विक्री सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कळंब शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी गुटखा विकणाऱ्या एका तरुणावर कळंब पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. त्याच्याकडून ४८० रुपये किमतीचा विमल पान मसाला जप्त करण्यात आला आहे.
पवन बापु पवार (वय ३०, रा. कल्पनानगर पारधी पिडी, कळंब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कळंब शहरातील जुन्या बसस्थानकातील मोकळ्या जागेत आरोपी पवन पवार हा शासनाने प्रतिबंधीत केलेला केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून होता. याची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून त्याला रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी त्याच्याकडील ४८० रुपये किमतीचा गुटखासाठा जप्त केला आहे. याप्रकरणी पवन पवार याच्या विरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ (कोटपा) च्या कलम ६ (अ) आणि २४ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.







