कळंब : पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो किलोमीटर दूर छत्तीसगडमधून कळंबमध्ये आलेल्या एका मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्या १६ वर्षांच्या पोटच्या गोळ्याने आपले आयुष्य संपवले. जोगेश्वरी निषाद असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून, या घटनेने पालक आणि मुले यांच्यातील हरवत चाललेल्या संवादाचा आणि तंत्रज्ञानाच्या विळख्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
जोगेश्वरीचे आई-वडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. सोमवारी संध्याकाळी, दिवसभराच्या कामानंतर घरी परतलेल्या वडिलांकडे जोगेश्वरीने मोबाईलवर गेम खेळण्यासाठी हट्ट धरला. मात्र, वडिलांनी नकार देताच तिचा चेहरा पडला. हा नकार तिच्या मनाला इतका लागला की, घरातील स्लॅबच्या कडीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपले जीवन संपवले.
काही वेळाने कुटुंबीयांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्या वयात फुलासारखे जपायचे, हसायचे-बागडायचे, त्या वयात एका निर्जीव मोबाईल गेमसाठी तिने उचललेले हे टोकाचे पाऊल सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले आहे.
ही केवळ एका मुलीच्या आत्महत्येची बातमी नाही, तर बदलत्या काळात पालक आणि मुलांमध्ये निर्माण होत असलेल्या भावनिक दरीचे भीषण वास्तव आहे. या घटनेमुळे कळंब शहरातील डिकसळ परिसरात शोककळा पसरली असून, कळंब पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.