कळंब – शहरातील गोविंद बाबा मठ सभागृहाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उपकरणांपासून ते लहान मुलांच्या खेळण्यांपर्यंत विविध वस्तू लंपास केल्या आहेत. ही घटना जवळपास महिनाभरापूर्वी घडली असली तरी, याप्रकरणी गुरुवारी (दि. १४ ऑगस्ट) कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुवर्णा सुधाकर इंगळे (वय ४२, रा. शेळका धानोरा, ता. कळंब) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री १० ते २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोविंद बाबा मठ सभागृहाचे कुलूप तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून चोरट्यांनी मठातील विविध वस्तू चोरून नेल्या.
चोरट्यांनी मठातील एक हार्ड डिस्क, २ इलेक्ट्रिक सर्व्हिलन्स नग, ७ बुलेट कॅमेरा सप्लायर, २ इलेक्ट्रिक केबलचे बंडल, २ बर्नर स्टोव्ह, ५ स्टेनलेस स्टीलची भांडी, १ डिनर सेट, १ कॉम्प्युटर प्रिंटर आणि लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्यामधील २ स्लाईड, २ झोपाळे आणि २ सी-सॉ असा एकूण २ लाख ४८ हजार ४२० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
जवळपास महिनाभरानंतर सुवर्णा इंगळे यांनी गुरुवारी कळंब पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.