कळंब : तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिलेवर गावातीलच एका ३५ वर्षीय तरुणाने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान, पीडिता घरी एकटी असताना आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. तसेच, फोनवरील संभाषणाची रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीच्या पत्नीने पीडित महिलेसोबत व तिच्या मुलीला शिवीगाळ केली.
या प्रकरणी महिलेने १ मार्च २०२५ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार, भा.न्या.सं.कलम- 64(एम), 351(4),352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
भांडणाच्या कारणावरून युवकावर हल्ला; आरोपींवर गुन्हा दाखल
भूम : शहरातील आलमप्रभु पानटपरीजवळ पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून एका युवकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भूम पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, साहिल कॉम्प्लेक्सजवळ आलमप्रभु पानटपरीसमोर वसीम नसीर मोगल (वय २९, रा. कसबा मोगलवाडा, भूम) याच्यावर आरोपी सलमान दस्तगीर पठाण (रा. शिवशंकर नगर, भूम) व त्याच्या दोन साथीदारांनी जुना वाद उकरून काढत हल्ला केला. आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
या प्रकरणी वसीम मोगल यांच्या फिर्यादीवरून दि. १ मार्च २०२५ रोजी भूम पोलिस ठाण्यात येथे भा.न्या.सं.कलम 109, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.