तुळजापूर : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात दोन अज्ञात भामट्यांनी महिलेची फसवणूक करून गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, लता तुकाराम कोळेकर (वय 50, रा. मोर्डा, ता. तुळजापूर) या 28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7.10 ते 7.30 वाजताच्या सुमारास तुळजापूरच्या नवीन बसस्थानक परिसरात थांबल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधत, “तुळजापूरमध्ये चोऱ्या वाढल्या आहेत, सोन्याचे दागिने घालून फिरू नका,” असे सांगून त्यांना विश्वासात घेतले.
या बोलण्यात गुंतून लता कोळेकर यांनी गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने उतरवून पिशवीत ठेवल्याचा भास निर्माण करण्यात आला. मात्र, त्या दोघांनी कुशलतेने फसवणूक करत दागिने लंपास केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी लता कोळेकर यांनी 1 मार्च 2025 रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.
ढोकी येथे शेतातील मोटारींची चोरी, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
ढोकी : तालुक्यातील रामवाडी परिसरात शेतातील पाण्यासाठी लावलेल्या मोटारी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप ज्ञानोबा हाजगुडे (वय 55, रा. रामवाडी, ता. जि. धाराशिव) यांचे शेत गट क्रमांक 03 मधील तेरणा नदीवरील 7.5 एचपी क्षमतेची लाडा कंपनीची मोटार, कॉपर वायर आणि त्यांचे शेजारी असलेल्या दोन पानबडी मोटारी अज्ञात व्यक्तीने 27 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 1 ते पहाटे 8 वाजेदरम्यान चोरून नेल्या.
या चोरीप्रकरणी दिलीप हाजगुडे यांनी 1 मार्च 2025 रोजी ढोकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भादंवी कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या मोटारींच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.