धाराशिव – गोवंशीय जनावरांचे शिर, पाय आणि इतर अवयवांचा साठा केल्याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, तौफिक शफिक कुरेशी (रा. मुंबई, ह.मु. खॉजा नगर, धाराशिव) याने पिंपरी शिवारातील गट क्रमांक 118 आणि 14 मध्ये असलेल्या सिफा बोन मिल ॲड फर्टिलायझर कंपनीत गोवंशीय तसेच इतर जनावरांचे शिर, पाय आणि इतर अवयवांचा साठा करून ठेवल्याचे आढळले.
1 मार्च 2025 रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या बाबत माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर अवयवांचा साठा आढळून आला.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(क)(ड) आणि 9(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्राण्यांची निर्दय वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
लोहारा – प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देऊन वाहतूक केल्याप्रकरणी लोहारा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोहारा पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, राहुल गौतम सुरवसे (वय 31, रा. भातंगही, ता. लोहारा, जि. धाराशिव) याने 1 मार्च 2025 रोजी पहाटे 1.30 वाजता लोहारा ते कास्ती खुर्द जाणाऱ्या मार्गावर जोड आंबा फाटा येथे छोटा हत्ती (MH 12 RN 7680) या वाहनामध्ये दोन जर्सी गायी आणि एक खोंड असे एकूण 1,57,000 रुपये किंमतीच्या जनावरांची वाहतूक केली.
वाहतुकीदरम्यान जनावरांसाठी अन्न-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना निर्दयपणे कोंबून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली.
याप्रकरणी लोहारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (डी), 11(1)(ई), 11 (1) (एच) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.