कळंब : लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि पगाराच्या पैशांची मागणी करून सतत मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरून एका ३० वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा राजू शिंदे (वय ३०, रा. मुकबधीर शाळेच्या शेजारी, कळंब) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मनिषा यांनी दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.
याप्रकरणी संजय चंद्रकांत पवार (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी राहुल राजेंद्र शिंदे आणि दुरगुडे सर (दोघेही रा. येरमाळा, ता. कळंब) यांनी मयत मनिषा यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन, “तुझ्या पगाराचे पैसे मला दे, तेव्हाच तुझ्यासोबत लग्न करतो,” असे म्हणून ते सतत मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून मनिषा शिंदे यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी संजय पवार यांच्या तक्रारीवरून, कळंब पोलिसांनी आरोपी राहुल शिंदे आणि दुरगुडे सर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी कळंब पोलीस अधिक तपास करत आहेत.