कळंब : लग्नासाठी तगादा लावून आणि पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिल्यामुळे एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलिसांनी तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिवाजी माने (वय २५, रा. शेलगाव दिवाणे, ता. कळंब) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेशने दिनांक २ फेब्रुवारी २०२५ ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान शेलगाव दिवाणे येथील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
याप्रकरणी गणेशचा भाऊ ज्योतीबा शिवाजी माने (वय ३०) यांनी १६ जुलै २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी हर्षदा नवनाथ दिवाणे (रा. शेलगाव दिवाणे) ही गणेशला वारंवार फोन करून पैशांची मागणी करत होती. तसेच, ‘अनैतिक संबंध चालू ठेव नाहीतर लग्न कर’ असा तगादा लावून मानसिक त्रास देत होती. याच त्रासाला कंटाळून गणेशने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या आधारे येरमाळा पोलिसांनी आरोपी हर्षदा दिवाणे हिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३५१(२)(३) (लैंगिक शोषण) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.