नळदुर्ग- तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे एका ३५ वर्षीय पान टपरी चालकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुसिद्धप्पा उर्फ सिध्दराम दहीटणे (वय ३५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. वडिलांच्या अपघाती मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निखिल कांबळे नामक आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत गुरुसिद्धप्पा दहीटणे हे केशेगाव येथे पान टपरी चालवत होते. दहा वर्षांपूर्वी , आरोपी निखिल कांबळे याच्या वडिलांचा मयत दहीटणे यांच्या पान टपरीवर विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्याच घटनेचा राग आरोपी निखिलच्या मनात होता. वडिलांच्या मृत्यूला गुरुसिद्धप्पा यांना जबाबदार धरून, त्याच रागातून आरोपीने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भर दिवसा शनिवारी सकाळी कांबळे याने कुऱ्हाडीचे घाव घालून दहिटणे याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी निखिल कांबळे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत. या घटनेमुळे केशेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.






