तुळजापूर – तालुक्यातील खंडाळा येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या एका घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला.
याप्रकरणी नारायण सुधाकर पवार (वय ३५, रा. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण पवार यांचे घर मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान बंद होते. याच वेळेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत घराच्या छताचे पत्रे उचकटले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घरातील एका खोलीचा कडी-कोंडा तोडून कपाटात ठेवलेले ४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच नारायण पवार यांनी दुसऱ्या दिवशी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.