मुंबई – विधानसभा निवडणुकीचा रंग गडद होत चालला आहे, आणि राजकीय मैदानावर आता कोलांट्या उड्यांचा जोरदार उत्सव सुरू आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा यंदाचा उडीचा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला आहे. पाटील साहेबांनी भाजपला मोठ्या अदबीनं ‘राम राम’ ठोकत, “रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी!” अशी घोषणाबाजी करत थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मैदानात धडक मारली आहे.
हे सगळं काय घडलं? तर सांगायचं झालं, महायुतीच्या खेळात इंदापूरचं तिकीट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याचं लक्षात येताच, पाटील साहेबांनी असा पवित्र उडीचा खेळ खेळला, जणू काही राजकीय जिम्नॅस्टिक्सचं प्रशिक्षण घेतलं होतं! “कोलांटी उडी” हा शब्द आता त्यांच्या नावासमोर लावला तर नवल वाटायला नको!
दरम्यान, राज्यातील महायुती म्हणजे एक मोठा कुंभमेळा आहे, ज्यात भाजप, शिंदे गट, आणि अजित पवार गट अशी जोडी आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, आणि काँग्रेसचे शिलेदार आहेत. या दोन महाकुंभांमध्ये भरकटलेल्या माजी आमदारांची सध्या जोरदार गोची सुरू आहे. काहींना पवारांच्या ‘तुतारी’चा आवाज गोड वाटतोय, तर काहींना उद्धव ठाकरे यांच्या ‘मशाली’चं तेज खुणावतंय, आणि काहींनी थेट काँग्रेसच्या ‘हाताचा’ आधार धरला आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदरच, इकडून तिकडे झेपावण्याचं राजकीय मंडळींचं ‘जॉगिंग’ जोरात सुरू आहे.