वाशी – वाशी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कुंथलगिरी येथील जैन मंदिरात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटीतील तब्बल १२ लाखांपर्यंतची रोकड व पितळी मूर्ती चोरून नेल्या. ही घटना १६ ते १७ ऑक्टोबरच्या रात्री घडली.
याप्रकरणी उमंग रविंद्र शहा (वय ४५ वर्षे, रा. कुंथलगiri, ता. भुम) यांनी १७ ऑक्टोबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मेन गेटचा कडी-कोंडा तोडला. आत प्रवेश करून त्यांनी दानपेटी फोडली आणि त्यातील अंदाजे ९ लाख ते १२ लाख रुपयांची रोख रक्कम व देव-देवतांच्या पितळी मूर्ती (एकूण अंदाजे किंमत १२ लाख १० हजार ५०० रुपये) लंपास केल्या.
उमंग शहा यांच्या तक्रारीवरून, वाशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५(डी) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र विविध ठिकाणी दुचाकी चोरी
धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, भूम, तुळजापूर, तामलवाडी, उमरगा आणि कळंब तालुक्यांतही चोऱ्या आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे.
- भूममध्ये मोटारसायकल चोरी: भूम येथील सोलापूर गणेश मंदिराच्या शेडमधून अण्णा अगंद अडतरे (वय २४, रा. देवळाली) यांची २० हजार रुपये किमतीची हिरो स्पेलेंडर मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.यु. ३२०२) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान घडली.
- तुळजाभवानी मंदिरात मोबाईल चोरी, चोरटा ताब्यात: तुळजापूर येथे दर्शनासाठी आलेले सुसेन गणपतराव मुळे (वय ७०, रा. चिंचोली, जि. लातूर) यांचा १४ हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल श्री तुळजाभवानी मंदिरामधील गणपती मंदिराजवळून एका विधी संघर्ष बालकाने (अल्पवयीन) चोरला. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून तुळजापूर पोलिसांनी तात्काळ तपास करून त्या बालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
- तामलवाडीत घरासमोरून दुचाकी लंपास: पिंपळा खुर्द (ता. तुळजापूर) येथे आण्णा शहाजी कदम (वय २६) हे त्यांच्या मेव्हण्याच्या घरी आले असता, घरासमोर लावलेली त्यांची स्पेलेंडर प्लस मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.आर. २७६४) दि. १४ ते १५ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
- उमरग्यात हॉस्पिटलमधील रुग्णाचे पैसे चोरले: उमरगा येथील बेडदुर्गे हॉस्पिटलमध्ये आय.सी.यू. वॉर्डात उपचार घेत असलेले भिमराव शामराव चव्हाण (वय ६५, रा. जळकोटवाडी) यांच्या पॅन्टच्या खिशातील ५० हजार रुपये रोख रक्कम राणी निळकंट चव्हाण (रा. येणेगुर) या महिलेने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे.
- कळंबमध्ये शेतातून मोटारसायकल चोरी: ईटकुर (ता. कळंब) येथील भोगजी शिवारातील शेत गट नं. २६९ जवळ रोडवर लावलेली महेंद्र सखाहरी आडसुळ (वय ४९) यांची २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्पेलेंडर (क्र. एमएच २५ व्ही ०९३५) चोरट्यांनी लंपास केली.
या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. एकाच दिवशी चोऱ्यांच्या इतक्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.