लोहारा – गालात चापट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ३५ वर्षीय व्यक्तीला सहा जणांच्या टोळक्याने बियरच्या बाटल्या आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना लोहारा तालुक्यातील माकणी येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या वैद्यकीय जबाबानुसार लोहारा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १७ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास माकणी गावातील ‘राहुल बार ॲण्ड हॉटेल’ मध्ये घडली. फिर्यादी नागनाथ बाळू साळुंखे (वय ३५, रा. काटे चिंचोली, ता. लोहारा) हे बारमध्ये असताना आरोपींसोबत त्यांचा वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गालात चापट मारण्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून नागनाथ साळुंखे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी आणि बियरच्या रिकाम्या बाटल्यांनी जबर मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर दोन दिवसांनी, १९ जुलै रोजी, नागनाथ साळुंखे यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहीत हणुमंत गवळी, आनंद सतिष वाघमारे, समाधान जयसिंग शिंदे, खंडु सुभाष कांबळे, पप्पु राजेंद्र वाघमारे आणि राम भरत वाघामारे (सर्व रा. माकणी, ता. लोहारा) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.