धाराशिव – लोहारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांच्या अपात्रतेचा जिल्हाधिकार्यांनी काढलेला आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आला आहे. राज्य निवडयूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी याबाबतचे आदेश काढून सहा जणांचे सदस्यत्व कायम ठेवले आहेत.
खेड ग्रामपंचायतची निवडणुकीसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होऊन निकाल 5 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाला. दरम्यान ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य सचिन सुरेश जाधव, अर्चना अविनाश राठोड, अब्दुल शेख, राजश्री रमाकांत कांबळे, जया दिलीप कांबळे, शर्विन शाजातअली शेख यांच्यावर निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढून खर्च सादर न केल्याचा ठपका ठेवून पराभूत उमेदवार रमाबाई बाबासाहेब गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांनी सुनावणीबाबत नोटीस जारी केली होती. 29 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यांनी सदस्यांच्या पाच वर्षासाठी अपात्र ठविण्यात येत असल्याचा निकाल दिला होता. या विरोधात सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे 24 नोव्हेंबर 2023 रोजी दाद मागितली. यात धाराशिवचे जिल्हाधिकारी, लोहार्याचे तहसिलदार व तक्रारदार ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभूत उमेदवार रमाबाई बाबासाहेब गायकवाड यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगासमोर 27 डिसेंबर 2023 रोजी सुनावणी घेण्यात आली. अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांच्या वतीने अॅड.अश्विनी जाधव, अॅड.राजश्री पवार व अॅड. डी.जे. घोडके यांनी आयोगासमोर बाजू मांडली. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब विहित नमुन्यात निवडणूक अधिकार्यांकडे बँक खात्याद्वारे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी ट्रू व्होटर नावाच्या मोबाईल अॅपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचा पर्यायही दिलेला आहे. परंतु उमेदवारांचे बँक स्टेटमेन्ट अपलोड करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे अर्जदारांनी 8 ऑगस्ट 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केल्याचे लक्षात घेता हे अपात्रतेचे कारण असू शकत नाही, असा युक्तीवाद अर्जदारांच्या वकिलांनी केला. हा युक्तीवाद तसेच अशा अनेक प्रकरणात न्यायालयाने दिलेले निकाल लक्षात घेता सदस्यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द करावा, अशी विनंती वकिलांनी आयोगासमोर केली.
या प्रकरणात दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकार्यांचा 10 नोव्हेंबर 2023 चा अपात्रेचा आदेश रद्द केला आहे. 3 जानेवारी 2024 रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खेड ग्रामपंचायतच्या अपात्र ठरविलेल्या सर्व सहा सदस्यांना दिलासा मिळाला आहे.