लोहारा : “आमच्या भागात काम करायचे असेल तर पैसे द्यावे लागतील,” अशी धमकी देत खंडणीसाठी ‘टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, कंपनीच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल विश्वनाथ पांचाळ (वय ३७) हे टाटा पॉवर कंपनीत नोकरी करतात. सध्या लोहारा तालुक्यातील धानुरी-नंदीपाटी रस्त्यालगत असलेल्या मोघा शिवारात कंपनीचे काम सुरू आहे. बुधवार, दि. ३० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास विशाल पांचाळ आणि त्यांचे सहकारी काम करत असताना आरोपी त्याठिकाणी आले.
आरोपी अजित माणिक मुसांडे, शंकर तात्याराव मुसांडे, नरहरी राजेंद्र बाबर आणि विशाल कर्ण जमादार यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून कर्मचाऱ्यांना अडवले. “तुमच्या कंपनीला इथे काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील,” असे म्हणत त्यांनी खंडणीची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी नकार देताच आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्या, दगड आणि काठ्यांनी जबर मारहाण केली. यात पांचाळ आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी कंपनीच्या गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडल्या आणि मोठे नुकसान केले.
या भ्याड हल्ल्यानंतर विशाल पांचाळ यांनी गुरुवारी, दि. ३१ जुलै रोजी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार खंडणी, जीवघेणा हल्ला करणे (हत्येचा प्रयत्न), दंगल माजवणे, मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.