नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव येथे गावचे पुढारी सातलिंग मल्लीनाथ पाटील (४७) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी रंगनाथ दबडे, विजय जाधव, कालीदास जाधव, अक्षय मारेकर, आकाश बनसोडे, दिपक बनसोडे, प्रशांत दबडे, राहुल देशमुख आणि नागनाथ राघुजी या नऊ जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मारुती मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत आरोपींनी सातलिंग पाटील यांना गाठले. “तू गावचा पुढारी आहेस का? थांब तुझे पुढारपण काढतो,” असे म्हणत त्यांनी पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी सळई आणि दांड्यांनीही त्यांच्यावर हल्ला केला. यात पाटील गंभीर जखमी झाले. भांडण सोडवण्यासाठी धावून आलेल्या पाटील यांच्या पुतण्यालाही आरोपींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर सातलिंग पाटील यांनी २० सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 118(2), 118(1), 115(2),189(2), 191(2),191(3), 190, 352, 351(2) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.