महाराष्ट्राचे लाडके, पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अजूनही न साकारलेले अजित पवार, म्हणजे मोकळा ढाकळा आणि थेट बोलणारे. ज्यांना राजकारणात ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं, त्यांची खासियत म्हणजे पोटात काही ठेवत नाहीत. ओठात जे आहे, तेच बाहेर. कोणाला आवडो अगर न आवडो!
आता विधानसभेच्या तोंडावर सुरू झालेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवर दादांनी पुन्हा एकदा आपली “बेधडक शैली” दाखवली आहे. विरोधकांनी योजनेवर टीका करत सांगितलं की, निवडणुकीनंतर ह्या योजनेचा ‘रामराम’ होईल. पण दादा कुठे शांत बसणारे होते? “लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. गरिबांना बाहेर काढायचं आहे, कोण कोर्टात गेले तरी आम्ही ठाम आहोत,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, दादा बोलले, “चुकीचं केलं तर चक्की पिसिंग अँड पिसिंग!” म्हणजे तुमच्या भ्रष्टाचाराच्या नाड्या मी घट्ट ओढणार, असा सणसणीत इशारा त्यांनी दिला.
आता एक मजेदार किस्सा. दादांच्या म्हणण्यानुसार, एका पठ्ठ्याने बायकोचे तब्बल 28 फोटो काढून योजनेचा फायदा करून घेतला, पण दादांनी त्या लूटमारीचा बुरखा फाडला! ‘भ्रष्टाचाराला कोणतीही संधी नाही,’ असं म्हणत दादांनी भ्रष्टाचाऱ्यांना ‘चक्की पिसिंग’ चा परिणाम काय असतो हे दाखवून दिलं.
येणाऱ्या निवडणुकीनंतर ‘दादा’ मुख्यमंत्री होणार का?
“दादा” पाचव्यांदा उपमुख्यमंत्री तर झाले, पण मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अजूनही फक्त स्वप्नच. महाराष्ट्रातील जनता मात्र उत्सुकतेने थांबलीय, “दादा मुख्यमंत्री होतील का?” हा प्रश्न चिन्ह काही सुटायला तयार नाही. पण आम्हीही दादांसाठी सदिच्छा व्यक्त करतो – दादा मुख्यमंत्री होवोत! कारण, दादांसारखा ‘स्पष्टवक्ता’ मुख्यमंत्री झाला तर काय धमाका होईल, ते पाहायलाच हवं!
– बोरूबहाद्दर