धाराशिव – 2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी शुक्रवारी केला होता.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे महायुती तथा राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ पुत्र मल्हार पाटील यांनी शुक्रवारी सकाळी प्रचार फेरी काढून जाहीर सभा घेतली होती. त्यात हा गौप्यस्फोट केला होता.
आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण असल्याचे सांगून 2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, अजित काकांनी आम्हाला पुढे पाठवले आणि नंतर ते मागून महायुतीत आले, हे मी जबाबदारीने बोलतो, असेही मल्हार पाटील म्हणाले.
या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ मल्हार पाटील यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आला होता. मल्हार पाटील यांच्या या वक्तव्याची दाखल अनेक वृत्तवाहिन्यांनी घेऊन बातम्या प्रसारित केल्या. त्यानंतर अजित पवार यांनी मल्हार पाटील यांची कानउघडणी केल्यानंतर पाटलांनी तो व्हिडीओ फेसबुक पेजवरून डिलीट केला, पण अनेकानीं तो डाऊनलोड करून घेतल्याने मल्हार पाटील यांची कोंडी झाली आहे.
यावर बोलताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खोचक टोला मारला आहे. मल्हार पाटील यांच्या किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका म्हणजे शरीरात सगळे पक्ष गेले की कोणत्याही पक्षात जायला मोकळे, असा खोचक टोलाही ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. लोकांना गृहीत धरून राजकारण केले तर या गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, आता प्रचाराची दिशा ठरलीये. धाराशिवची लढाई पद्मसिंह पाटील कुटुंब विरुद्ध पवनराजे निंबाळकर कुटुंब आहे. उघड आहे. झाकून नाही. बार्शीतील लोकांना माहिती नसेल. पद्मसिंह पाटील धाराशिव 40 वर्ष मंत्री होती. त्यानंतर राणा पाटलांना वर्गात मॉनिटर केलं नसेल पण शरद पवारांनी यांना मंत्री केलं. यांना एकूण 45 वर्ष मंत्रीपद मिळालं. एवढे वर्ष जिल्ह्याचे नेतृत्व केलं, यांनी साध्य काय केल? धाराशिव जिल्हा दारिद्र्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला. पद्मसिंह पाटील यांनी 2009 मध्ये श्रीमंत खासदारांपैकी क्रमांक 3 चे खासदार होते.
45 वर्षे सत्ता भोगून एका रात्रीत हे कुटुंब कमळाबाईकडे गेलं. कमळाबाईला विकास जमला नाही, म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे आली. 45 वर्ष मंत्री देऊनही शरद पवारांशी गद्दारी केली. मला पलीकडे गेलो तर 50 खोके मिळत होते. पण 50 खोक्यांवर लाथ मारुन मी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा राहिलो, असंही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं.