धाराशिवच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे. प्रश्न फक्त पक्षांतराचा नाही; प्रश्न आहे निष्ठा, विकास आणि जनतेच्या विश्वासाचा.
2019 मध्ये अखंड शिवसेनेच्या तिकिटावर ओमराजे निंबाळकर प्रथमच लोकसभेत पोहोचले. त्यांनी त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव करून धाराशिवच्या राजकारणात स्वतःची ताकद सिद्ध केली. त्यानंतर 2022 मध्ये शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. अनेक नेते सत्तेच्या दिशेने गेले, पण ओमराजे यांनी तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. “निष्ठा” हा त्यांचा राजकीय ब्रँड बनला.


2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मशाल हाती घेतली आणि विरोधात महायुतीची पूर्ण ताकद उभी असतानाही तब्बल साडेतीन लाखांच्या आसपास मताधिक्याने विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली, राज्यातील सत्ताधारी यंत्रणा सक्रिय होती, तरीही ओमराजेंनी मतदारांचा कौल आपल्या बाजूने खेचला. त्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ खासदाराची नव्हे, तर ठाकरे गटाच्या “लढवय्या चेहऱ्याची” बनली.
उद्धव ठाकरे यांनी त्यांना अनेकदा “शिवसेनेचा वाघ” म्हटले. शिंदे गटावर टीका करताना ओमराजे यांनीही शब्दांची तलवार चालवली होती. “आम्ही खोके घेत नाही”, “उद्धव साहेबांना सोडणार नाही” अशी विधाने त्यांच्या भाषणांची ओळख बनली होती. त्यामुळे आज त्याच ओमराजेंनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ओमराजे यांचे म्हणणे मात्र स्पष्ट आहे. सत्ता नसल्यास विकास होत नाही. निधी मिळत नाही. अधिकाऱ्यांकडून कामे होत नाहीत. मतदारसंघातील प्रकल्प रखडतात. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून विकासासाठी सत्तेत जाणे आवश्यक आहे, असा त्यांचा दावा आहे.


हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणाचा अनुभव सांगतो की सत्तेशी जवळीक असलेल्या लोकप्रतिनिधींना विकासकामांसाठी अधिक संधी मिळतात. परंतु याच ठिकाणी मोठा प्रश्न उभा राहतो — जर विकासासाठीच पक्ष बदलावा लागत असेल, तर निवडणुकीत मतदारांनी दिलेला निष्ठेचा कौल कुठे ठेवायचा?
आज ओमराजेंवर “गद्दार” अशी टीका होत आहे. कालपर्यंत निष्ठेचे प्रतीक मानल्या गेलेल्या नेत्यावर अचानक विश्वासघाताचे आरोप होत आहेत. राजकारणात हे नवीन नाही. कालचे नायक आज खलनायक ठरतात आणि उद्या पुन्हा नायक बनतात. पण जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी मात्र नेत्याचीच असते.
ओमराजे म्हणतात, “निष्ठा ठेवली तेव्हा विकास का करत नाही, असे लोक विचारत होते. आता विकासासाठी सत्तेत गेलो तर निष्ठा सोडली म्हणून टीका होते.” त्यांच्या या युक्तिवादात काही प्रमाणात वास्तव आहे. मात्र जनतेला आता भाषणांपेक्षा निकाल हवेत. घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष विकास हवा आहे.
खरा प्रश्न असा आहे की, ओमराजेंनी पक्ष बदलला म्हणून धाराशिवचा विकास आपोआप होणार आहे का?
जर पुढील दोन-तीन वर्षांत रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, उद्योग आले, रोजगार वाढला, रस्ते व पाणी प्रश्न सुटले, तर इतिहास त्यांच्या निर्णयाला धाडसी राजकीय पाऊल म्हणेल. पण जर परिस्थिती “जैसे थे” राहिली, तर विकासाचे कारण देत घेतलेला हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक ठरू शकतो.
राजकारणात निष्ठा आणि सत्ता यांच्यातील संघर्ष जुना आहे. ओमराजेंनी निष्ठेपेक्षा सत्तेची वाट निवडली आहे. आता त्यांच्या समोर एकच आव्हान आहे — धाराशिवकरांना सिद्ध करून दाखवणे की हा निर्णय स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी नव्हता, तर जिल्ह्याच्या विकासासाठी होता.
आज टीका होत आहे, उद्या टाळ्याही वाजू शकतात. पण त्यासाठी विकासाची भाषा कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसावी लागेल. धाराशिवची जनता आता भाषण ऐकणार नाही; ती हिशेब मागणार आहे. आणि त्या हिशेबाची वेळ आता सुरू झाली आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह





