धाराशिव : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील बहुचर्चित ‘महाकाली कला केंद्र‘ सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. परवान्यातील अटींचा भंग करून रात्रभर चालणारे सादरीकरण, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस विभागाच्या अहवालानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पाच कला केंद्रांचे परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच कायमस्वरूपी रद्द केले होते. परवाना वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचा फायदा घेत पळवाटा काढून महाकाली हे एकमेव कला केंद्र रात्रभर सुरू ठेवण्यात आले होते. या नियमबाह्य कारभाराबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी हे केंद्र बंद करण्याचे निर्देश दिले.
नियमभंग आणि गंभीर त्रुटी:
-
अटींचे उल्लंघन: हे कला केंद्र अक्षय साळुंखे यांना भाडेतत्त्वावर चालवण्यास दिले होते. परवान्यानुसार येथे केवळ पारंपारिक वाद्यांवर सादरीकरण अपेक्षित असताना, प्रत्यक्षात साऊंड सिस्टीमवर नृत्य सादरीकरण केले जात होते.
-
माहिती लपवली: प्रशासनाने वारंवार मागूनही कला केंद्राचे चालक कलाकारांची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी सादर करत नव्हते.
-
गुन्ह्यांची नोंद: ५ ऑगस्ट २०२५ रोजी कला केंद्रासमोर दोन गटांत झालेल्या भांडणप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या केंद्राच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
कळंब येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आपला चौकशी अहवाल सादर केला होता, ज्यात अनेक नियमांचा भंग होत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या अहवालात आणि पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या लेखी अहवालात हे केंद्र सील करण्याची शिफारस केली होती.
सध्या कला केंद्राचे मूळ चालक राजाभाऊ सीताराम माळी यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत हे ‘महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र’ कायमस्वरूपी सील ठेवण्याची कारवाई करण्यात आली आहे.





