धाराशिव – १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य’ ने दिलेल्या इशाऱ्यानंतर आज, १ जुलैपासून राज्यभरातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. पूर्वसूचना देऊनही शासनाने मागण्या मान्य न केल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. धाराशिवमध्ये, सर्व रुग्णवाहिका चालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमले असून त्यांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.
युनियनने ३० जून २०२५ पर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास १ जुलैपासून काम बंद करण्याचा इशारा दिला होता. चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अत्यंत कमी वेतन , कामाची वाईट स्थिती , आणि जीवितास धोका निर्माण होणाऱ्या घटनांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या मागण्या प्रलंबित असूनही त्याकडे सेवा पुरवठादार आणि सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप युनियनने केला आहे.
यापूर्वी, १३ मे २०२५ रोजी आझाद मैदानावर आंदोलन करूनही केवळ आश्वासन मिळाले, पण प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही, असे युनियनचे म्हणणे आहे. वारंवार विनंती करूनही सेवा पुरवठादाराने चर्चेस प्रतिसाद दिला नाही. अखेर कोणताही पर्याय न उरल्याने ‘काम बंद’ आंदोलनाचे शस्त्र उचलावे लागत असल्याचे संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले होते.
आज सकाळपासून रुग्णवाहिका सेवा ठप्प झाल्याने राज्यातील अत्यावश्यक आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात किरण देडे , विकास चंदनशिवे, संतोष शेंडगे , नंदकुमार ढेपे, कमलेश भोसले, आकाश दराडे आदी सहभागी झाले आहेत.
Video