नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शेत जमिनीच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश उद्धव घुगे (वय ४०) हे दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईसह अणदूर शिवारातील गट नं. ३५/१/१ येथे गेले होते. या जमिनीवरून त्यांचे चुलते आणि आरोपी प्रदीप घुगे यांचा भाऊ यांच्यात न्यायालयात दावा प्रलंबित आहे.
शेतात काम करत असताना आरोपी प्रदीप शिवाजी घुगे आणि सुरेखा नंदू राठोड यांनी फिर्यादीचे चुलत भाऊ अभिषेक उत्तम घुगे आणि चुलती छाया उत्तम घुगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी महेश आणि त्यांच्या आईने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली असता, आरोपी प्रदीप घुगे याने “हे शेत माझ्या भावाच्या मालकीचे आहे” असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली.
यानंतर आरोपी प्रदीप घुगे याने शेतातील दगड उचलून फिर्यादी महेश यांच्या उजव्या हातावर आणि चुलत भाऊ अभिषेक याच्या हातावर व पाठीत मारून त्यांना जखमी केले. या भांडणात फिर्यादीच्या चुलतीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तुटून कुठेतरी पडून गहाळ झाले.
घटनेनंतर जखमींना नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महेश घुगे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजून ४७ मिनिटांनी आरोपी प्रदीप शिवाजी घुगे व सुरेखा नंदू राठोड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंद शिवाजी कांगुणे करत आहेत.