मुंबई: महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयाद्या नव्याने तयार केल्या जाणार आहेत.
मतदार नोंदणीचा तपशीलवार कार्यक्रम खालीलप्रमाणे:
- जाहीर सूचना प्रसिद्ध करणे: ३० सप्टेंबर, २०२५ (मंगळवार)
- अर्ज (नमुना १८ किंवा १९) स्वीकारण्याचा अंतिम दिनांक: ०६ नोव्हेंबर, २०२५ (गुरुवार)
- प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी: २५ नोव्हेंबर, २०२५ (मंगळवार)
- दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी: २५ नोव्हेंबर, २०२५ ते १० डिसेंबर, २०२५ (बुधवार)
- दावे व हरकती निकाली काढणे: २५ डिसेंबर, २०२५ (गुरुवार)
- मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: ३० डिसेंबर, २०२५ (मंगळवार)
नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना:
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार नोंदणीसाठी सुधारित अर्ज नमुना क्र. १८ (पदवीधर) आणि नमुना क्र. १९ (शिक्षक) वापरणे आवश्यक आहे. या अर्जांमध्ये आधार क्रमांक देण्यासाठी रकाना उपलब्ध आहे, परंतु आधार क्रमांक देणे ऐच्छिक आहे. केवळ आधार क्रमांक दिला नाही म्हणून कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदारांकडून गोळा केलेल्या आधार क्रमांकाची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्याच्या आणि ती सार्वजनिक होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अर्जाच्या छापील प्रतींवर आधार क्रमांकाचे पहिले आठ अंक झाकणे (Masking) बंधनकारक करण्यात आले आहे.
या निवडणूक कार्यक्रमाबाबत व्यापक प्रसिद्धी करण्याचे आणि सर्व राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात माहिती देण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.